आरोग्य विम्यासाठी आदर्श वय काय?
हुशार आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या नेहाला पाहून वाटतं, की ती स्वत:विषयी कायम दक्ष असते
जितक्या लवकर तुम्ही विमा काढाल तितके फायदे जास्त आहेत. पंचविशीचे असताना तुमच्या आरोग्याच्या समस्या अर्थातच कमी असतात, यामुळेच तुम्हाला जास्तीत जास्त कवच दीर्घकाळासाठी मिळू शकते.
एका नामांकित जाहिरात संस्थेतील ‘ट्रेनी एक्झिक्युटिव्ह’ म्हणून २३ वर्षीय नेहा पालवने नुकतीच नोकरीस सुरुवात केली आहे. महिन्याला २५,००० रुपये कमावते. हुशार आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या नेहाला पाहून वाटतं, की ती स्वत:विषयी कायम दक्ष असते.आता तिच्या वैयक्तिक आर्थिक बाबींकडे पाहू या. तिचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचं (पीपीएफ) एक खातं आहे आणि एक पारंपरिक विमा पॉलिसी आहे. तिला तिच्या पालकांनी ती भेट म्हणून दिली आहे. वयाच्या २३व्या वर्षी नेहाकडे तिच्या इतर समकालीन मित्रमंडळींप्रमाणेच आरोग्यसेवेशी संबंधित कुठलेही संरक्षण नाही. तिच्या कंपनीने तिला सामूहिक पॉलिसीअंतर्गत पाच लाखापर्यंतचे कवच दिलेले आहे. तरुण आणि आत्मविश्वासू असलेल्या नेहाला वाटतं की तिला अशा आरोग्याशी संबंधित पॉलिसी घेण्याची गरज नाहीच. किमान आता तरी त्याची काही एक गरज नाही. दुर्दैवाने, तिशीतील बहुतांश लोक असाच विचार करतात.
आयुष्य अधिकाधिक महाग होत चाललंय. आजाराला आमंत्रण असलेली आधुनिक जीवनशैली आणि वैद्यकीय सेवा यांची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तीन लाखांचं कवच तर फक्त हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्यावरच संपून जातं. त्यात जर एखादी शस्त्रक्रिया किंवा काही गुंतागुंत असेल तर कठीणच. खरं तर वैद्यकीय खर्च गगनाला भिडले आहेत. यामुळेच एखाद्याच्या वैद्यकीय बचतीतून अशा प्रकारे वैद्यकीय खर्चासाठी निधी उभा करणं हे अत्यंत जिकिरीचं आहे. या परिस्थितीत, आरोग्य विमा काढणेच अधिक शहाणपणाचे आहे. तुमच्या बचतीची आणि तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीचीही तो काळजी घेतो.जितक्या लवकर तुम्ही विमा काढाल तितके फायदे जास्त आहेत. तुम्ही पंचविशीचे असताना तुमच्या आरोग्याच्या समस्या अर्थातच कमी असतात, यामुळेच तुम्हाला जास्तीत जास्त कवच दीर्घकाळासाठी मिळू शकते.
दुसरं म्हणजे, जितक्या लवकर तुम्ही आरोग्य विमा काढाल, तितकी तुमची प्रीमियरची रक्कम कमी असेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा टर्म विमा (मुदतीचा विमा) काढताय तर तो तुम्हाला आजीवन काळासाठी संरक्षण देऊ शकतो. जर असा लाइफ-टर्म विमा काढण्यासाठी तुम्ही चाळिशीपर्यंत वाट पाहिलीत तर त्यासाठी लागणारा विम्याचा हप्ता जास्त आणि विमा मिळण्याचा काळसुद्धा कमी असेल.
तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जरी विमा कवच असेल तरी स्वतंत्र वैद्यकीय विमा काढून ठेवा. जवळच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि तुमचा नोकरीच्या ठिकाणचा विमा त्यासाठी उपयुक्त ठरत नसेल, अशा परिस्थितीचा विचार करा. तसेच तुम्ही जेव्हा निवृत्त व्हाल तेव्हा तुमचा हा विमाही संपेल. यामुळेच तुमचा खर्च पेलू शकेल अशा विम्याची गरज भासेल. हो, अर्थात तुम्हाला जर तुमची बचत खर्च करून टाकायची नसेल तर. तसेच साठीनंतर एखादा विमा घेणे तर फारच कठीण होऊन बसतं.
खरं तर आता आरोग्य विमा घेणे खूपच सोपे बनले आहे. ओपीडी (बाह्य़ रुग्ण तपासणी), व्हेक्टर बॉर्न आजार आणि अगदी बाळंतपणासाठीसुद्धा कवच देणाऱ्या योजना उपलब्ध झाल्या आहेत. अगदी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला नाहीत तरी, तुमच्या संपूर्ण आयुष्याची वैद्यकीय देयके विमा पुरवते.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तुम्ही विमा खरेदी करणे आणि आरोग्य विम्याचा प्रत्यक्ष आजारपणात, चालू आजार आणि विशेष औषधोपचारासाठी लाभ होणे यासाठी एक प्रतीक्षा काळ (वेटिंग पीरियड) असतो. यामुळेच जितक्या लवकर तुम्ही विमा काढाल तितका शस्त्रक्रियेसाठीचे संपूर्ण वैद्यकीय कवच किंवा वैद्यकीय किंमत मिळण्याची शक्यता वाढते. थोडक्यात, तुम्ही विमा घेण्यासाठी साठीची वाट पाहिलीत तर जास्तीत जास्त प्रीमियम भरण्यासाठी तयारीत राहा.
सध्या, सरकार सार्वत्रिक आरोग्य विमा योजनेच्या दिशेने पावले टाकत आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना यांसारख्या योजनेतून याची सुरुवातही झाली आहे. सर्व बँकांमधून सर्व खातेदारांना अगदी जन धन खातेदारांनाही अत्यंत नाममात्र हप्त्यांमध्ये ही योजना घेता येते. असेच पाऊल आरोग्य विम्याबाबतही टाकले जाऊ शकेल. यामुळेच आरोग्य विमा उत्पादनही अभूतपूर्व कमी खर्चात अधिकाधिक लोकांना उपलब्ध होणार आहेत
साभार- लोकसत्ता
No comments:
Post a Comment